Click here for Online Consultation
DR.CHITALE ENT HOSPITAL
ENT AND HEAD & NECK CENTRE


Vertigo and Balance Patient Stories


वैशाली कराळे, औरंगाबाद.

मला ४ वर्षांपूर्वी चक्कर यायला सुरवात झाली. चक्कर वारंवार येत होती. परंतु गेल्या सप्टेंबर पासून सारखी चक्कर यायला लागली. खूप दवाखाने केले. एकदोन वेळा ऍडमिट पण झाले. दोनदा CT स्कॅन केला. पण काहीच निघाले नाही. खूप डिप्रेस झाले. बाहेर काय घरातही भीती वाटायची. पूर्ण घर डिस्टर्ब झाले. जगणे नकोसे झाले. व्हर्टिगो वरच्या गोळ्या सुरु झाल्या त्याने तेवढ्यापुरता फरक पडायचा.
नंतर मार्च मध्ये डॉ. चितळे मॅडम विषयी कळाले. मॅडमनी खूप छान समजावले. मग दर १५ दिवसांनी औरंगाबाद ते पुणे ट्रिप सुरु झाली. व्यायाम सांगितले. पहिले पहिले व्यायामाने पण खूप फिरल्यासारखे व्हायचे. नंतर हळू हळू फरक पडू लागला. आता जुलै मध्ये मला बराचसा आत्मविश्वास आलाय. हे फक्त चितळे मॅडम आणि सलोनी मॅडम मुळे.
तेंव्हा मी त्यांची दोघींची शतशः आभारी आहे. त्या सांगतील तो व्यायाम नियमित केला तर नक्कीच तुम्ही ठीक होणार.



वसंत शाहूराव कायगुडे, रा. वालचंदनगर.

मला सन २००८ मध्ये अचानक ST मध्ये प्रवास करीत असताना दरदरून घाम येऊन चक्कर आली त्यावेळी माझी परिस्थिती इतकी भयानक झाली होती कि मला रिक्षा करून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. त्यानंतर सुद्धा माझी चक्कर थांबत नव्हती. मी तीन महिने झोपून काढले. मला एकट्याला घराच्या बाहेर सुद्धा जाता येत नव्हते. त्या नंतर मी बऱ्याच डॉक्टरांकडे तपासणी केली. काही डॉक्टरांचे म्हणणे मानेच्या मणक्यांमध्ये गॅप पडल्यामुळे चक्कर येते. तर काही डॉक्टर सांगायचे कानामुळे चक्कर येते. मी मानेचा MRI काढून डॉक्टर पंचवाघ याना भेटलो. त्यांनी मानेच्या मणक्याचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. ते न्यूरो सर्जन आहेत. त्यांनी असेही सांगितले कि ऑपरेशन केले तरी तुमची चक्कर थांबणार नाही. तुम्हाला कानामुळे चक्कर येत आहे. मी दररोज चक्कर साठी गोळी खात होतो. परंतु दररोज गोळी खाल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. दोन किलोमीटर बाहेर जावयाचे झाले तरी मला भाड्याने गाडी करून जावे लागत असे. त्यामुळे जीवन नकोसे झाले होते.
एक दिवस सकाळ पेपर मध्ये डॉ. विनया चितळे यांचा विना औषध चक्कर थांबते असा लेख वाचला आणि मी खूप आनंदी झालो. मी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मार्च २०१५ मध्ये मॅडमना भेटलो. त्यांनी माझ्या कानाची तपासणी करून वेगवेगळ्या प्रकारचे मेंदूला अनुसरून व्यायाम शिकवले. आणि आश्चर्य म्हणजे मी मार्च २०१५ पासून आजतागायत चक्करेवरची गोळी खाल्लेली नाही. माझी चक्कर पूर्ण थांबलेली आहे. आता मी एका दिवशी ३०० ते ४०० किलोमीटरचा प्रवास बसने एकटा करू शकतो. इतका मला आत्मविश्वास आलेला आहे. खरंच माझ्यासाठी मॅडम देवदूत म्हणून आल्या असे वाटते. आता मला चक्करेची कसलीच भीती राहिलेली नाही.
फक्त त्या सांगतील त्या प्रमाणे न चुकता व्यायाम करीत आहे.


ज्योती अ. नारकर, डोंबिविली (पूर्व) मुंबई.

मला साधारण २ वर्षे झोपेतून उठताना तसेच झोपेतून वळताना, चालताना, वरतीखालती बघितल्यावर कोणत्याही कारणामुळे जोरात चक्कर येत होती. त्याच्यावर मी मुंबईमध्ये बऱ्याच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केले. परुंतु कोणताही विशेष असा फायदा झाला नाही. मला माझ्या घरातील किंवा घरा बाहेरील कामे दुसऱ्याच्या मदतीशिवाय करता येत नव्हती. त्यामुळे मी फार अस्वस्थ आणि परावलंबी झाल्या सारखे वाटत होते.
दिनांक १४ ऑगस्ट २०१५ सकाळ पेपरमध्ये फॅमिली डॉक्टर या सदराखाली डॉ. विनया चितळे चक्रदेव यांचा " विना औषध चक्कर थांबवा " हा लेख वाचला व कोणताही विचार न करता दिनांक २२ ऑगस्ट २०१५ रोजी पहिल्या तपासणीसाठी पुणे येथे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. तपासणीअंती डॉ. विनया चितळे चक्रदेव यांनी मला खात्रीने सांगितले कि याच्यावर उपचार होईल व तुम्ही पूर्ण बऱ्या होणार असे सांगितल्यावर माझा विश्वास वाढला व मला आशेचा किरण दिसू लागला. नंतर त्यांनी आम्ही मुंबई येथे राहत असल्यामुळे त्यांच्या हॉस्पिटलमधील डॉ. सलोनी राजे ह्यांच्याशी चर्चा करून पुढील तपासणीसाठी पुण्यामध्ये दोन दिवस राहण्याची विनंती केली. त्या प्रमाणे डॉ. सलोनी राजे यांनी तपासणी करून पुढील उपचार केले त्याचवेळी मला बराचसा फरक पडत आहे असे वाटले.
डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे व्यायामाचे प्रकार दररोज करणे व त्यांना सहकार्य करणे अश्या पद्धतीने दिनांक २२ ऑगस्ट २०१५ ते २२ मार्च २०१६ (११ तपासण्याच्या वेळा) करत मला डॉ. सलोनी राजे यांनी "मी तुम्हाला डिस्चार्ज देत आहे" कारण तुम्ही फिट आहात असे सांगितले.
आता मी माझ्या घरातील किंवा घरा बाहेरील कामे दुसऱ्याच्या मदतीशिवाय करते. तसेच घराबाहेर जाताना मला कोणतीही भीती वाटत नाही. स्वतःची कामे स्वतः करते.
डॉ. विनया चितळे चक्रदेव व डॉ. सलोनी राजे ह्यांनी केलेल्या उपचारामुळे मला आता पूर्वीसारखे नवीन जीवन मिळाल्या सारखे वाटले. कोणत्याही गोळ्या, औषध न घेता त्यांनी मला स्वावलंबी बनविले. अश्या या उपचार केंद्राचा फायदा ज्यांना त्रास होत असेल त्यांनी अवश्य घ्यावा हि नम्र विनंती.
डॉ. विनया चितळे चक्रदेव व डॉ. सलोनी राजे यांनी केलेल्या उपचारांमुळे व दिलेल्या विश्वासामुळे मी लवकर बरी झाले. मी त्यांची सदैव ऋणी आहे.


शरद दत्तात्रय जांभेकर, पुणे.

मला व्हर्टिगो चक्कर चा त्रास १५ ते १८ वर्षांपासून आहे. या पूर्वी आम्ही कराडला असताना बऱ्याच डॉक्टरांचे अनुभव घेतले. उपचार व तपासण्या सर्व झाले. परंतु ऑलोपॅथिक गोळ्या घेऊन तात्पुरते बरे वाटायचे. त्या गोळ्यांनी नुसती झोप येऊन सर्व शरीर, मेंदू सुन्न होई. स्मृती कमी कमी होत असे. कालपरवा, नुकत्याच घडलेल्या गोष्टी आठवत नसत. त्यानंतर परत थोडे दिवस बरे वाटायचे. पण नंतर पुन्हा त्रास चालू होई. सारखीच चक्कर येत असे. तोल जाणे व उलट्यांचा त्रास होत असे.
आता आम्ही होमिओपॅथिक घेऊन पाहूया म्हणून सातारच्या डॉ. पाटील यांच्या कडे ट्रीटमेंट १ वर्षे घेतली. त्यांनी १ वर्षे त्रास कमी झाल्या सारखा वाटलं. परंतु पुन्हा तोच त्रास ६ महिन्यांनी होउ लागला.
सर्विसमध्ये असताना MD डॉक्टरांचे उपचार घेतले होते. परंतु काहीही उपयोग झाला नाही. राजीनामा द्यावयाची वेळ आली होती. परंतु कंपनीने सहानभूती दाखवली व शेवटची दोन वर्ष काम बदलून दिले व मदतनीस माणूस देऊन सहकार्य केले.
पुणे येथे आल्यावर दोन वर्षे आजार कमी वाटला. परंतु २०१२ मध्ये पुन्हा सुरवात झाली ती इतकी कि रोजच चक्कर येऊ लागली. उलट्या पण होउ लागल्या. त्यानंतर निवारा मध्ये Physio Therapy चा उपचार घ्यायचे ठरले व सर्व औषधे व गोळ्या बंद करून डॉ. रानडे यांचा कडे १ वर्ष ट्रीटमेंट चालू ठेवली. खूपसे बरे वाटले. परंतु पूर्ण चक्कर थांबली नव्हती.
त्यानंतर डॉ. विनया चितळे यांच्याकडे डॉ. नेहा कुलकर्णी यांनी जाण्यास सांगितले. आम्ही डॉ. विनया चितळे यांच्याकडे मार्च २०१५ पासून ट्रीटमेंट घेतली. एकही गोळी किंवा औषध घेतले नाही. नुसत्या व्यायामावरच त्यांनी जी ट्रीटमेंट दिली त्याने पूर्णपणे बरे वाटले. आजपर्यंत चक्कर व उलटी आली नाही. त्यांनी आम्हाला ज्या ज्या वेळी बोलावले तेंव्हा तेंव्हा आम्ही तिथे ट्रीटमेंट घेतली व त्यापद्धतीने वेळच्यावेळी व्यायाम केले. आता जवळ जवळ ४ ते ५ महिने झाले. एकदाही चक्कर आली नाही व उलटी सुद्धा झाली नाही.
हे सर्व डॉ. विनया चितळे यांच्या उपचार पद्धतीने झाले आहे.


सौ सत्यवती सो. चोपडे, चिरखली.

मला तीन वर्षांपूर्वी कानामध्ये आवाज येणे, कान ठणकणे वगैरे त्रास होत होता. दोन तीन महिन्यानंतर कानाच्या दुखण्यामुळे चक्कर येणे, मळमळणे व उलट्या होणे हा त्रास सुरु झाला. दिवसामधून ३ ते ४ वेळा उलट्या होत होत्या. त्यामुळे मी नेहमी बेचैन राहत असे. उलट्यामुळे व गरगरण्यामुळे घरातील कोणतेही काम करता येत नव्हते. मला एकटीला घरामध्ये सोडून घरच्यांना जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मी MD मेडिसिन, MS अशा तज्ञ डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु केली. शरीराच्या सर्व वैद्यकीय चाचण्या म्हणजे MRI ब्रेन, सोनोग्राफी CT स्कॅन, रक्त, लघवी तपासणी, ल्युपिड प्रोफाइल टेस्ट, इत्यादी सर्व प्रकारच्या तपासण्या केल्या नंतरही योग्य निदान झाले नाही. कुणी डॉक्टर उलट्या बंद होण्यासाठी स्टेमॅटिलच्या गोळ्या आणि थकवा येत असल्यामुळे टॉनिकच्या गोळ्या व सलाईन देत असत. त्यामुळे तात्पुरता आराम मिळे.परुंतु गोळ्या संपल्यानंतर पुन्हा जोरात त्रास होत होता. आमचेकडील म्हणजे जिल्हा बुलढाणा येथील ENT स्पेशालिस्ट यांची सुद्धा ट्रीटमेंट घेतली. त्यांनी व्हर्टिगो म्हणून निदान केले. परुंतु वैद्यकीय उपकरणाअभावी त्यांची ट्रीटमेंट योग्यरितीने झाली नाही. बिमारी वाढतच होती. मला तर जगणे कठीण झाले. घरातील सर्व बेचैन झाले.
आई, दोन्ही मुले पुण्यामध्ये असतात. त्यांनी डॉ. विनया चितळे मॅडम यांचा सकाळ पेपरला दिनांक १४ मार्च २०१४ रोजी "फक्त रुग्ण सेवेसाठी मी पुन्हा मायदेशी परतणार" हा लेख वाचला आणि आम्हाला फोन करून सांगितले. आपणास तुझ्या बिमारीवरील योग्य डॉक्टर मिळाले असून तू ताबडतोब पुण्याला निघून ये. मी आणि घरचे लोकांनी त्वरित निर्णय घेऊन आम्ही ताबडतोब पुणे गाठले. चितळे हॉस्पिटलला फोन करून अपॉइंटमेंट घेतली. मॅडमनी तपासणी केल्यानंतर व कानाची ऑडिओ टेस्ट केल्यानंतर व्हर्टिगो सांगून आपणास बॅलन्स ट्रीटमेंट घ्यावी लागेल असे सांगितले. परुंतु आपण अगोदर बुलढाणाच्या डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या तात्काळ बंद करू व त्या औषधीचा असर शरीरामध्ये जवळपास २० दिवस राहत असल्यामुळे २० दिवसानंतर या.
त्याप्रमाणे २० दिवसानंतर डॉ चितळे मॅडमनी माझी पुन्हा तपासणी केली आणि सांगितले आपणास एकही औषध / गोळ्या न घेता ट्रीटमेंट करायची आहे. त्यानुसार फिजिओ थेरपिस्ट कडून योग्य प्रकारे व्यायाम करून घेतले. व त्याप्रमाणे प्रथम १५ दिवस व नंतर २० दिवस अशाप्रकारे वेगवेगळे व्यायाम करून घेतले. मला एकच महिन्यात फरक पडून प्रथम मला होण्याऱ्या उलट्या, गरगरणे, तोल जाणे बंद झाले. अश्या प्रकारे एकूण ६ बॅलन्स ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी पूर्णपणे बरी झाले. मला कानाचा / उलट्या होणे मळमळ वगैरे कोणताही त्रास राहिला नाही. डॉ. चितळे मॅडम मुळे मी पूर्णतः बरी झाले व त्यांच्या मुळेच निरोगी जीवन जगत आहे. त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे.
माझी डॉ. चितळे मॅडमकडे येण्याऱ्या पेशंटला नम्र विनंती आहे आपण मॅडम सांगतील त्याप्रमाणे योग्य व्यायाम / उपचार पूर्ण करावे. अपूर्ण सोडू नये. आपण नक्कीच बरे व्हाल. परंतु ट्रीटमेंट सुरु असताना कोणत्याही प्रकारची औषध, गोळ्या घेऊ नका. धन्यवाद


सौ उर्मिला भालचंद्र देवधर, वय ६५ वर्षे, पुणे.

गेली ८-९ वर्षे मला चक्कर येण्याचा त्रास होता. एकदा चक्कर आली कि आठवड्याची वाट लागायची. उलट्या, झोप, डोकं दुखणं, डोळ्यासमोर अंधेरी, मळमळ असे सगळे प्रकार एकाच वेळी व्हायचे. त्रास सहन करत मी तशीच अंधारात पडून दिवस काढत होते. खूप त्रास व्हायचा. घर विस्कटलं जायचे. थोडं बरं वाटलं कि आपले काम सुरु. औषध घेतल्यावर थोडे दिवस बर वाटायचं. पण एक ते दीड महिन्यांनी हाच त्रास सुरु व्हायचा. शेवटी कंटाळून मी आमच्या फॅमिली डॉक्टरना विचारले कि हा त्रास सारखा सारखा कश्यामुळे होतो. तेंव्हा ते म्हणाले कि बहुतेक कानाचा त्रास असावा. तेंव्हा मी डॉ. विनया चितळे यांच्या कडे आले. माझे औषध चालू असल्यामुळे त्यांनी मला ८-१० दिवसांनी बोलावले.
मी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी मला बॅलन्सिंग करायला पाठवले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे माझ्या टेस्ट होत गेल्या. त्यावेळी त्यांना कानात त्रास असल्याचे जाणवले. मला काय त्रास आहे व त्यासाठी लागण्याऱ्या उपाय योजनांची मला माहिती दिली. व माझ्या उपचाराची सुरवात झाली. ३-४ सेटिंग्स नंतर मला थोडा बदल जाणवू लागला. मी त्यांचे व्यायाम करायला लागले. थोडीफार घरात हिंडूफिरू लागले.
मला घरातून मिस्टर व मुलीचा चांगला पाठिंबा व आधार मिळाला. माझ्या बरोबर ते डॉक्टरांच्या कडे येत होते. उपचारांमुळे माझा आत्मविश्वास वाढीस लागला. उत्साह वाढला. मी बरी होणार अशी मला अशा वाटू लागली.
९ महिने मी उपचार घेतले. एका संघ्याकाळी ट्रीटमेंट झाल्यावर मी बरी झाले असे सांगून त्यांनी मला आनंदाचा सुखद धक्का दिला.
हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे हा आजार बरा होण्यातला आहे. चिकाटीने आपण त्याचे व्यायाम व उपचार घेतल्याने नक्कीच बरे होऊ शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ट्रीटमेंट मध्येच सोडू नका. डॉक्टरांच्या बद्दल खात्री बाळगा व आपले आयुष्य नव्याने सुरु करा.
थोडा त्रास कंटाळा जाणवेल पण पुढील सुधारणा नक्कीच आनंददायी असेल.

Thank you डॉक्टर.


श्री अनिल महादेव कुदळे, लोणंद.

मला साधारण १९८७-८८ पासून वर्षातून एकदा चक्कर यायला लागली. नंतर २००१ला जास्त चक्कर जाणवायला लागली. तेंव्हा CT स्कॅन केले. रिपोर्ट नॉर्मल. तिथपासून आमची ट्रीटमेंट चालू झाली. स्टुजेरॉन, स्टुजेरॉन फोर्टे, मास्ट, मास्ट-I , मास्ट-II फेरजुन DB इत्यादी गोळ्या सतत खायला लागायच्या. मग लोणंदचे डॉ. यादव, नंतर फलटणचे डॉ.राऊत, नंतर बारामतीचे डॉ.भोईटे यांचे शेजारी दवाखाना आहे (सायकॅट्रिस). नंतर पुण्याचे डॉ.सोनावणे, डॉ.भाटे अंजली नंतर डॉ.बा. तांबे, नंतर रुबी हॉलचे डॉ.घोरपडे नंतर कर्वेरोडचे डॉ.मंगेश उदार तसेच फिरते आयुर्वेदिक हडपसरचे डॉ.गोसावी इथपर्यंत आमचा प्रवास झाला. डॉ.उदार यांच्या कडील गोळ्यांनी खूपच झोप यावयाची. डॉ.गोसावींनी कान वाहण्याचा थांबेल आणि ऐकू येईल याची गॅरंटी सांगितली पण चक्करेचे काही सांगता येत नाही (गॅरंटी नाही) असे सांगितले. त्यांचे अगोदर डॉ.अंजली भाटे, डॉ.विजय सोनावणे यांचेकडे ऑपरेशन झाले होते. पण तरीही डॉ.गोसावी यांचे कडे ऑपरेशन करावे लागले. तिथे रिझल्ट मिळाला पण चक्कर थांबली नाही. मग सकाळ पुणे पेपर वाचण्यात आला. औषध आणायला पुण्यात आलो तेंव्हा १९,२० मार्च २०१४ ला पेपर वाचून अपॉइंटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट चालू झाली.
पहिले सीटिंग ५००/-, दुसरे सीटिंग ३००/- तिसरे सीटिंग ३००/-, चौथे सीटिंग ३००/-. एकूण १४००/- रुपये. फक्त एवढ्याच पैश्या मध्ये मी पूर्ण पणे बरा झालो. ट्रीटमेंट एप्रिल १४ ला सुरु झाली जून १४ ला पूर्णपणे बरा झालो. मी एवढे खुलासेवार सांगण्याचे कारण म्हणजे मी एवढ्या डॉक्टरांकडे (दवाखाने) गेल्यावर किती पैसा गेला असेल याचा अंदाज सर्वाना येईलच. तसेच बरोबर CT स्कॅन, MRI, रक्त, लघवी, कार्डिओग्रॅम, 2D इलेकट्रोडॉप्लर, HIV, N.B., व्हायरल अशा कितीतरी तपासण्या झाल्या तरीही चक्कर तशीच, याचा परिणाम असा होत होता. मला घरचे लोक (आई, पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी इत्यादी) “ याला काम करायचे नाही, मुद्दाम ढोंग करतोय. खातोय पितोय सर्व करतोय. आणि काम करायलाच चक्कर येतेय” अशा पद्धतीने घरचे वागायचे तसेच गोळ्या औषधे तपासण्या यांचा तर वैताग आला होता. कधी कधी असं वाटायचे आता आत्महत्या करावी या विचारांपर्यंत पोहचयचो त्यादरम्यान मला हॅपी थॉट्स (तेजोज्ञान फौंडेशन) सत्संग मिळाला आणि आत्महत्येपासून परावृत्त झालो. आणि प्रार्थना करू लागलो आणि प्रार्थेनेचे फळ म्हणून मला डॉ. विनया चितळे साक्षात परमेश्वराच्या / गुरूच्या रूपात भेटल्या. आणि माझ्या जीवनाचे परिवर्तन झाले. माझी हिस्टरी चितळे मॅडमनी ऐकून घेतली आणि मला दिलासा दिला. त्यांच्या बोलण्यामध्ये इतका आत्मविश्वास होता कि काय बोलूच नका कारण अगोदर एवढी औषधे तपासण्या झाल्यावर पेशंटची काय अवस्था असेल हे आपण समजून घ्या. मी पूर्णपणे बरा झालेपासून जोरदार कामाला लागलो आहे. आणि मी सर्व बॅकलॉग भरून काढणारच आहे. मी सध्या फक्त ४-५ तास झोपतोय आणि बाकी वेळेत काम आणि कामच चालू असते. तर मा. डॉ.विनया चितळे याना कोटी कोटी धन्यवाद. आणि परमेश्वर त्यांना खूप खूप आयुष्य देवो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना. पूर्ण बरा झाल्या पासून मी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी फोन करतोय पण सतत बाहेरदेशी आणि इथे असल्यावर माझी भेट झाली नाही. तेंव्हा आज ठरवलं OPD ला जायचेच आणि भेटायचे. तेंव्हा पुन्हा एकदा डॉ.विनया चितळे, हॉस्पिटल पूर्ण स्टाफ येथील सर्व सजीव निर्जीव वस्तूंना माझ्या कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद.
संपूर्ण कुटुंबाला घेऊन आपणास भेटण्यासाठी यावयाचे आहे. तरी मला थोडा तरी वेळ द्या हि नम्र विनंती.
तसेच “पुणे सकाळ”चेहि आभार. असेच प्रत्येक जिल्ह्यातील पेपर मध्ये बातमी देऊन पूर्ण भारतभर या क्लिनिकचा प्रचार प्रसार होऊन माझ्यासारखे अनेक रुग्ण बरे करावेत हीच माफक अपेक्षा.
कारण रुग्णाचे दुःख काय असते ते रुग्णच जाणतो.
भावनेच्या भरात मी जास्त लिहितो आहे असे वाटून घेऊ नका सत्य कथा सांगितली आहे. यात काहीही वाढवून घटवून नाही जस आहे तसाच लिहीत आहे. उलट आठवलं नसेल म्हणून बरेच राहिले आहे.
माझा भाव, विचार वाणी, क्रियेतून कोणाला दुःख पोहोचले असेल तर मी माफी मागतो. कृपया मला क्षमा करा. धन्यवाद.
डॉ.विनया चितळे यांचे नाव भारतातच नव्हे जगभरात उज्वल व्हावे आणि जास्तीत जास्त रुग्णांची सेवा त्यांचा हातून व्हावी यासाठी आमचे सर्व आयुष्य परमेश्वराने त्यांना द्यावे हि पुन्हा एकदा प्रार्थना.
लिहिण्या सारखे खुप आहे पण कुठेतरी थांबलं पाहिजे. धन्यवाद.


सौ हेमांगी हेमंत शिंदे, पुणे.

मी कसबा पेठ पुणे येथे राहते. मला ३ वर्षांपासून चक्कर येत होती. खूप दवाखाने फिरले पण फरक पडत नव्हता. डोक्याचे ECG केले. रिपोर्ट नॉर्मल आले. बाहेर काय घरातहि भीती वाटायची. जगणे नकोसे झाले होते. ३ वर्ष गोळ्या घेत होते पण फरक पडत नव्हता.
नंतर मे मध्ये चितळे मॅडम विषयी कळले. त्यांचा पेपर मध्ये लेख वाचला.
त्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी व्यायाम सांगितले त्यामुळे मी २ महिन्यातच बरी झाले. डॉ.चितळे मॅडम आणि डॉ.सलोनी मॅडम यांना धन्यवाद.


विवेक भालचंद्र जोशी, वय वर्ष ६४ रा. कर्वे रोड पुणे.

मला सुमारे ८ ते ९ वर्षांपासून व्हर्टिगो म्हणजे चक्कर येण्याचा त्रास होत होता. ऑफिसमध्ये काम करताना मोबाइलवर कॉल आला म्हणून मोबाइल उजव्या कानाला लावला असता नुसता टर्र्र्रर्र्र्र असा आवाज येऊ लागला. मला वाटले मोबाइल मध्ये बिघाड झाला आहे. परंतु कानाने दिलेला पहिला धोक्याचा संदेश होता. परंतु मला त्यावेळी व्हर्टिगो संबंधी काहीच माहिती नव्हती त्यामुळे कानाने दिलेला संदेश मी समजू शकलो नाही.
त्यानंतर सुमारे ६ - ७ महिन्यांनी ऑफिस मध्ये मीटिंग मध्ये असताना माझी केबिन पूर्ण गोलगोल फिरू लागली. आणि काही कळायच्याआत उलट्या सुरु झाल्या. खूप घाम येत होता. ३ ते ४ तास मला हा त्रास चालू होता. शेवटी फॅक्टरीतील डॉक्टरांनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा निर्णय घेतला. ६ तासांनी त्रास थांबला. हॉस्पिटलमधील ENT स्पेशालिस्टनी तपासणी करून व्हर्टिगोचा त्रास असल्याचे निदान केले. त्यांनी व्हर्टिन च्या गोळ्या सुरु केल्या. पुढील सुमारे ४ वर्षे त्यांच्या कडे ट्रीटमेंट चालू होती.परंतु व्हर्टिनच्या गोळ्या बंद केल्यावर चक्कर पुन्हा चालू.
त्या ट्रीटमेंटचा दूरगामी परिणाम दिसत नव्हता. म्हणून होमिओपॅथीच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरु केली. हि ट्रीटमेंट पण २ वर्षे घेतली. पण काहीच फरक दिसत नव्हता. चक्कर येण्याचे प्रमाण खूपच वाढले. घरातल्या घरात वॉशरूमला जायचे झाले तरी कोणालातरी बरोबर घेउन जावे लागे. मी कामानिमित्त परदेशात खूप वेळा प्रवास केला आहे. परंतु व्हर्टिगोमुळे घरातूनसुद्धा बाहेर पडणे बंद झाले. रिटायरमेंटनंतर हातात असलेल्या दोन जॉब-ऑफर नाकारून घरी बसण्याची वेळ आली. या सर्व प्रकारामुळे खूप नैराश्य आले. जोडीला कानात आवाज येणे सुरु झाले. ( Tinitus ). सर्वबाजूनी कोंडी झाली होती. परावलंबित्व आणि आजारपणामुळे जीवन नकोसे झाले होते. जे कोणी जो उपाय सांगेल तो करीत होतो. होमिओपॅथी, प्राणिक-हीलिंग, ओझोन थेरपी असे अनेक उपाय झाले. पण उपयोग शून्य.
पण सुदैवाने माझ्या एका मित्राकडून डॉ.विनया चितळे यांच्या कडील व्हर्टिगो क्लिनिक संबंधी माहिती कळाली. डॉ.चितळे यांची अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी प्रथम बेरा-टेस्ट आणि बॅलन्स-टेस्ट घेतल्या. मला नेमका काय आजार आहे हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने समजावून सांगून त्यावर खात्रीशीर उपाय उपलब्ध आहेत याची ग्वाही दिली. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूपच वाढला.
जसजशी ट्रीटमेंट घेत गेलो तसतशी माझ्या आजारपणात सुधारणा होत गेली. आणि आता मी माझ्या दररोजच्या ऍक्टिव्हिटी कोणावरही अवलंबून न राहता करू शकतो.
डॉ.विनया चितळे यांनी दिलेला विश्वास, त्यांची समजावून सांगण्याची पद्धत हि अतिशय आपलेपणाची आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्यास सुरवात होते. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे आणि त्यांचा या क्षेत्रातील अनुभव रुग्णाला हमखास बरे करतो. जो पर्यंत रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत त्यांना चैन पडत नाही हा आजकाल वैद्यकीय सेवेमध्ये दुर्मिळ झालेला गुण डॉ.विनया चितळे यांच्या कडे पुरेपूर आहे याचा मी प्रत्यक्ष्य अनुभव घेतला आहे..
माझ्या सारख्या अनेक रुग्णांना त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा होवो आणि त्यांचा हातून अशीच रुग्णसेवा घडो हि सदिच्छा.

डॉ.विनया चितळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा.